धरूनी मौन उत्तम, असे नित्य ज्यांची स्वानंद गती |
माते सकल मुनीश्रेष्ठ ते वंदिताती तुला त्रयजगती |
करी शोकनाश विश्वांचा, प्रसन्न मुखपद्म तुझे समर्थ अति |
स्वर्गाधिक-रम्य निकुंज धरेवरी, आई तुझी ती वस्ति |
वृषभानूची वंशवल्ली तू शोभसी नंदसुताची अंगना |
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||१||
अशोक मंडप-छाया तुजवरी, शोकविनाशिनी शोभे |
नको विलंब श्री-जननी, दे वराभय-दान झणी लोभे |
दे सुयश भक्तां असे, वर्णिता मती न हो वाणी,पंडितांना ||
प्रवालासम चरण तुझे कोमलांगी, कसे वर्णू स्मितानना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||२||
विलोकण्या विश्वंभरा_ लतांसम भ्रूचाप तुझा जो वळला |
गळला प्रतापमद इक्षुचापाचा, पाहून तुला तो खिजला |
असे वर्षवी नयनबाण की, वश्य हो रमारमण ||
लीला विचित्र मंगलरास प्रसंगी, पाहत राही पुंडरीकलोचन ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||३||
स्वर्ण, चंपक किंवा विद्युल्लता उपमा न पुरे किर्तनी |
सुआस्य कांती सरस अति ; कोटी शरदचंद्राते मात करी |
एकाग्र जणू चकोरतलगे चंद्रमंडल पाहताना ||
पुत्रविस्मृती झाली का गं पतिसेवनासी करताना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||४||
सदा प्रमुदित चित्त भूषण, शोभे ज्या नवतरुणीना |
मदभरीत त्या प्रेमपंडिता, प्रियकर-रंगी-रस घेताना |
निकुंजवासिनी दासी कृतार्थ, राज्ञी तयी-तू अशी चतुर रमणा ||
जरी प्रेमव्यस्त गांधर्वी जणू तू ; परि होशी सावध पुत्र व्यवधानां ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||५||
निमित्त ते मंदहास्य तुझे गे, आनंदकारणाब्धी जनना |
धीरही शोभे; हीरहार जसा की- तुज आमोद संचय होइ मना |
कुचादी गात्रे माते तुझी ती, तिरस्कारिती अमृत कलशाना ||
अशेष हावभाव दाखवूनी, तटस्थ करसी रतिमदना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||६||
नीलिमा झळके चंचल नेत्रांची; प्रेमावलोकन तू करताना |
लास्यनृत्य जसे करे लताग्र, वाऱ्यावर ते झुलताना |
जलतरंगी हले कमलदेठ जणू, भुजाच माते तुझीया ना ||
मोहित, मोहक, मिलनातुर, लंपट_ आश्रय तुझा त्या मनमोहना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||७||
त्रिगुणधाग्याचे मंगळसूत्र जे, अच्युते बांधिले शुभकंधरा |
म्हणूनी शोभे त्रिवलय-शंखाकृती कंठ तुझा साजरा |
स्वर्णमांगल्याही त्रयभास-त्रिरत्नें, प्रकाशी तया न दुसरा |
स्वैर लहरती कुरळकुंतले, स्तुत्य करती दिव्य सुमनांना |
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||८||
आनितंब मेखला फुलांच्या , पाही निशब्द सुंदर नटी |
सत्यनिनादक प्रशस्त धातूज, घंटीहारांसी शोभे कटी |
शुंडा घेऊनी गजेंद्र सर्व, लपले असती घोर वना |
जंघा, बाहू, मांडी सुंदर ; वाणी न थके वर्णिताना |
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||९||
श्रीप्रणवादी विद्या थोर, परि करती किमकिम शब्दांना |
पादकिंकरी चे गायन ते, तिरस्कारि राजहंसाना |
कमनीय सुंदर चाल तुझी मग, का न विडंबी स्वर्णलताना |
वर्णिले ध्यान माते सुभगे तव , भुरळ घालू दे पुत्रजना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||१०||
चिंतिता पादांगुली नखद्युती, भ्रूक्षेप देइ अगणित सिद्धी |
अनंतकोटी रमा पतिव्रता, अर्चानिश्चये धरती नम्रता |
पुलोम, स्रष्टा आणि हिमाद्री, जीवनसार्थक तपोधनी ||
म्हणूनी जन्मल्या गेही वरदे , तव भक्तांच्या शिरोमणी ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||११||
निर्वाहादी कर्मा आणिक, यज्ञ देवता स्वधाकारां |
अधीश्वरी तू वेदवाणीची, कोटी विश्वांची पोषणकरा |
धरणी-रमा ज्या विष्णूरमणा, शुभदा दासी तव चरणा |
इह-परधामी व्रजराज्ञी तू, शोभा पसरवी प्रमोदवना ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||१२||
लक्षोनी मोदक-अनुवाद समक्ष, माये अखंड वर्षवी कृपाकटाक्ष |
असो कर्मदुर्ग प्रारब्धादि जरी, कटाक्षस्तव हा वज्रापरी |
नंदसुताच्या रासमंडली प्रवेश करवी वृषभानूतनया ||
क्षमा दे जननी न्यूनाधिकाची, शरण आलो दामोदरजाया ||
कधी करशील गे माते कृपाकटाक्ष करूनी मातृभावना |
लागू दे करूणेचा पवन शीतल तव त्या मेघनयना |
चातक संतान तुझे मी, पुरवी गे माते मनोकामना ||१३||
#राधाकृपाकटाक्ष_अनुवाद
Comments